लहानपणी आई-वडिलांच्या मायेचे छत्र हरवल्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक काटेरी प्रसंगावर मात करून उद्योग विश्वामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारे नाव म्हणजेच श्री. दत्तात्रय जगताप! लहानपणापासून आई-वडील नसल्याने त्यांचे संगोपन आजी व मावशीने केले. जर एक मुलगी सक्षम बनली तर ती संपूर्ण घराची जबाबदारी घेऊ शकते असे लक्षात आल्यावर स्वतःला झालेल्या वेदना पुन्हा कोणाच्या आयुष्यात येऊ नये म्हणून निराधार मुलींसाठी ज्यांची दोन्ही पालक किंवा एक पालक नसलेल्या मुलींसाठी ‘आपण स्वतःहून काही केले पाहिजे’ या संकल्पनेतून श्री दत्तात्रय जगताप यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंतीचे औचित्य साधून “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना 3 जानेवारी 2023 रोजी केली. पालक नसलेल्या इयत्ता पाचवी ते दहावी मधील मुलींसाठी आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत असून श्री. दत्तात्रय जगताप व सौ. रूपाली जगताप हे प्रथम सेवक म्हणून कार्य करतात. फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींचा मानसिक- शारीरिक- सामाजिक असा सर्वांगीण विकास व्हावा व शिक्षण घेऊन प्रत्येक मुलगी ही सशक्त व्हावी हेच उद्दिष्ट “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” चे आहे. फाउंडेशन तर्फे अनेक शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य, मुलींच्या नावाची “मी लेक सावित्रीची” अशा आशयाची फोटो फ्रेम व भक्कम पाठिंबा देऊन प्रत्येक मुलीला सक्षम बनवले जाते. श्री दत्तात्रय जगताप यांनी स्वतःचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची सुरुवात केली. एका छोट्या गावातील मोजक्या शाळेपासून सुरुवात करून 2025 पर्यंत सातारा जिल्ह्यातील 50 हुन अधिक शिक्षण संस्था मधील 300 हुन अधिक शाळांमध्ये तसेच 3000 पेक्षा जास्त मुलींना मदत केली आहे. “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे महाराष्ट्र राज्यातील किमान दोन लाख मुलींना जानेवारी 2030 पर्यंत मदत करून सक्षम बनवण्याची ध्येय आहे ईश्वराच्या आशीर्वादाने व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने हे ध्येय साकार करू
एक लहान मूल जेव्हा हळूहळू वाढत असते पहिल्यांदा पालथे पडायला शिकते, नंतर हळूहळू रांगायला शिकते, काही महिन्याचे झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहायचा प्रयत्न करते आणि उभे राहिल्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या बोटाला धरून चालायला शिकते. एका नवजात शिशुला सर्वात प्रथम स्वतःच्या पायावर उभे राहून चालायला शिकवतात ते त्याचे आई-बाबा! बोटाला धरून संपूर्ण जग दाखवतात ते त्याचे आई-बाबा! पण जर एखाद्या निरागस मुलाला किंवा मुलीला जग दाखवण्यासाठी बोट धरून चालवण्यासाठी त्याचे आई-बाबाच नसतील? तर खरंच कल्पना करवत नाही..! त्यातही जर ती मुलगी असेल तर तिला स्वतःचे वडील सर्वात प्रिय असतात. पण पाठीवरती हात ठेवून शाबासकी द्यायला पालकच नसतील तर ती मुलगी किती हालअपेष्टा सोसत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही…
श्री. दत्तात्रय जगताप यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील. लहानपणापासून शिक्षणाला प्राधान्य देऊन शालेय शिक्षण गावांमध्ये पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ आजी व मावशी ने केला अनेक अडचणींना सामोरे जात खडतर प्रवासातून मोठ्या जिद्दीने त्यांनी एमबीए शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर मुंबईत येऊन अनेक छोटे मोठे काम करून काहीच वर्षात स्वबळावर त्यांनी “EnggMech Innovations Pvt. Ltd.” नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली व्यवसायात ही आलेल्या चढ उतारावर मात करून मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. आपल्या उद्योगांमध्ये आलेल्या अनेक अनुभवातून शिकून त्यांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन केले, अनेकांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यास मदत केली. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची दखल खुद्द ‘सह्याद्री वाहिनी’ ने घेऊन “झेप” या कार्यक्रमांमध्ये श्री. दत्तात्रय जगताप यांच्या आयुष्यावर माहितीपट बनवला.
श्री. दत्तात्रय जगताप यांनी ‘आपण समाजाचे देणे लागतो’ या भावनेतून समाज कार्य करायचे ठरवले आणि ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्त्री शिक्षणासाठी “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टची” स्थापना केली. स्वतःचा व्यवसाय सांभाळत मुलींच्या शिक्षणासाठी ते स्वतः प्रथम सेवक म्हणून समाजकार्य करत आहेत.
सौ. रूपाली जगताप यांचा विवाह श्री. दत्तात्रय जगताप यांच्याशी झाला. आयुष्यातील अर्धांगिनी होऊन त्यांनी घरची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत असताना सौ. रूपाली जगताप यांनी घर गाडा व्यवस्थित हाकला. घरात कोणतीही अडचण येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली. त्या स्वतः प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या व्यवसायात ही कार्यरत असून दोघांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” मध्ये प्रत्यक्षरीत्या कार्यरत आहेत. घर व संसार सांभाळत त्यांनी फाउंडेशनच्या कामांमध्ये स्वतःला झोकून घेतले आहे. संस्थेचे अनेक उपक्रम हे सौ. रुपाली या स्वतः जातीने लक्ष घालून पार पाडतात.
“आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” चे तसेच फाउंडेशनला जोडणाऱ्या अनेक मुलींचे श्री. दत्तात्रय जगताप हे वडील असतील तर सौ. रुपाली जगताप या आई आहेत. “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” सोबत जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक मुलींचे संगोपन जबाबदारीने करत सौ. रुपाली जगताप या प्रथम सेवक म्हणून कार्यरत आहेत.
Designed with ❤️ by Aasha Foundation Charitable Trust Team.